GRAMIN SEARCH BANNER

अलिबागमधील जमीन प्रकरणात सुहाना शाहरूख खान अडचणीत

अलिबाग: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. तिने आलिबागमध्ये शेती करण्यासाठी 1 जून 2023 रोजी दीड एकर जमीन विकत घेतली आहे. जमिनीचा व्यवहार आणि नोंदणीदेखील 1 जून रोजीच झाली होती.

या जागेची एकूण किंमत 12.91 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या दीड एकर जागेत 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. मात्र, ही जागा सरकारी असल्यामुळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता हा व्यवहार झाल्यामुळे सुहाना खान अडचणीत सापडली आहे.

अलिबाग तालुक्यातील थळ येथील सरकारी मालकीच्या जमिनीची विक्री बॉलीवूड आयकॉन शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला शर्थभंग करून कथित बेकायदेशीरपणे विक्री केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व वकील ॲड. विवेक ठाकूर यांनी दोन वर्षे पाठपुरावा करून पुराव्यांसह शासनाकडे या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

थळ येथे समुद्रकिनारी असलेली सर्व्हे क्र. 345/2, क्षेत्रफळ 0.60.70 हे.आर जमीन सन 1968 मध्ये कडक ना विक्री कलमाअंतर्गत लागवडीसाठी मंजूर केलेली सीआरझेडमधील जमीन खोटे कुटूंबाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केवळ साठेकराराव्दारे 12.91 कोटी रुपयांना विकली असल्याची तक्रार ॲड. विवेक ठाकूर यांनी शासनाकडे दाखल केली आहे. या तक्रारीत महसूल अधिकारी, उपनिबंधक आणि साक्षीदारांवर संगनमत, सीआरझेडचे उल्लंघन, खोटे तपासणी अहवाल सादर करणे आणि कोट्यवधी रुपयांचा राज्य महसूल लपवल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने सर्व विक्री कागदपत्रे रद्द करण्याची, भरपाईशिवाय जमीन सरकारजमा करण्याची आणि अनेक उच्चस्तरीय आदेशांना न जुमानता कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुहाना शाहरूख खान वादातील जमीन कोणती?

थळ सर्व्हे क्र. 345/2, क्षेत्रफळ 0.60.70 हे.आर. ही जमीन 1968 मध्ये लागवडीसाठी अटींसह नारायण विश्वनाथ खोटे यांना देण्यात आली होती. त्या जमिनीला जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय इतर वापरास व विक्रीस बंदी होती.

1968-69 साली या जमिनीची लागवडीसाठी वापर व झाडे लावण्यासाठी नारायण विश्वनाथ खोटे यांना शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. ही जमिन देताना जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या परवानगीशिवाय विक्री/तबादला/गहाण व्यवहार बंदी अशी प्रमुख अट नमूद केली होती. त्यानंतर नारायण विश्वनाथ खोटे यांचे वारस असलेल्या अंजली खोटे, रेखा खोटे व प्रिया खोटे यांनी ही जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. मात्र त्यावर अद्यापही परवानगी मिळालेली नाही.

तक्रारदाराचे आरोप

वारस अंजली, रेखा व प्रिया खोटे यांनी 1 जून 2023 रोजी 12.91 कोटी रुपयांना सुहाना शाहरूख खान हिला नोंदणीकृत साठेकराराद्वारे वर्ग-2 ची जमीन बेकायदेशीरित्या विकली. यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांची परवानगी घेतली नाही. जमीन हस्तांतरणासाठी अंजली, रेखा व प्रिया खोटे यांनी 14 फेब्रुवारी 2022 मध्ये वर्ग 2 ते वर्ग 1 करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अर्ज केला. परंतु या अर्जानुसार त्यांना परवानगी दिलेली नाही हे माहिती अधिकारामध्ये उघड झाले आहे. महसूल विभागाच्या कायदेशीर परवानगीशिवाय साठेकराराव्दारे 12.91 कोटीला सुहाना शाहरूख खान यांना ती जमिन विक्री करण्यात आली.

कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये जमीनीची नोंद

या जागेत अनधिकृत बांधकामे (घर नं. 1770, 1771, 367) करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी नाही. तरीही तत्कालीन मंडळ अधिकारी आर.एन. मांढरे यांनी जमिनीवर कोणतीही बांधकामे नाहीत, असा खोटा अहवाल तहसिलदार यांच्याकडे सादर केला. या अहवालातील पंचनाम्यावरील सह्या करणाऱ्या व्यक्ती सुहाना शाहरूख खान यांच्या वडिलांच्या कंपनीशी निगडीत असल्याचा ॲड.ठाकूर यांचा आरोप आहे. तसेच माजी मंडळ अधिकारी आर.एन. मांढरे यांच्यावर खोटी माहिती व तपासाचा गैरवापर केल्याचा तसेच सब-रजिस्ट्रार व महसूल कर्मचारी यांचे संगनमत असल्याचा आरोप तक्रारदार ॲड.ठाकूर यांनी केला आहे.

तक्रारदारांची मागणी

जमीन सरकार ताब्यात घेऊन जनकल्याणासाठी राखीव ठेवावी. साठेकरार व संबंधित सर्व कागदपत्रे रद्द करावीत. विक्रेते, खरेदीदार, अधिकाऱ्यांवर व पंचांवर कायदेशीर कारवाई करावी. चौकशी लवकर पूर्ण करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा.

कायदेशीर विश्लेषण

1) जमिनीचा दर्जा आणि अटी

ही जमीन भोगवटादार वर्ग 2 मध्ये असून 1968 च्या जिल्हाधिकारी आदेशान्वये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी देण्यात आली होती.

त्या आदेशात जिल्हाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी शिवाय विक्री, गहाण किंवा हस्तांतरण करता येणार नाही. परवानगीशिवाय हस्तांतरण झाल्यास जमीन परत सरकारकडे जमा करण्याचा स्पष्ट अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे नमूद आहे.

2) साठेकराराचे स्वरूप

31 मे/1 जून 2023 रोजी अंजली, रेखा व प्रिया खोटे यांनी सुहाना शाहरूख खान हिच्यासोबत नोंदणीकृत साठेकरार केला.

कायद्यानुसार साठेकराराने मालकी हस्तांतर होत नाही. अंतिम मालकीसाठी नोंदणीकृत खरेदीखत आवश्यक असते. या व्यवहारात खरेदी खत झालेले नाही. परंतु नोंदणीकृत साठेकरार करून सरकारचा हक्क असलेल्या जमिनीसाठी 12 कोटी 91 लाख रुपये देणे व स्वीकारणे हे बेकायदेशीर आहे. या जमिनीच्या अटींनुसार हा साठेकरारही हस्तांतरणाचा प्रयत्न मानला जाऊ शकतो.

3) कायद्याचे संभाव्य उल्लंघन

परवानगी न घेता व्यवहारजिल्हाधिकारी रायगड यांची मंजुरी नसताना सरकारी अटींच्या अधीन जमीन विक्रीसाठी करार करण्यात आला. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन जमीन -1 क्षेत्रात असून त्यावर बांधकामे असल्याचा उल्लेख नाकारला गेला. मंडळ अधिकाऱ्याने बांधकाम नाही असा अहवाल दिला. जो तक्रारदारांच्या मते खोटा आहे. या व्यवहारातून 12.91 कोटी रुपयांचा मोबदला झाला पण शासनाला ठराविक महसूल/अधिमूल्य मिळाले नाही.

Total Visitor Counter

2475024
Share This Article