चिपळूण : चिपळूण-कराड महामार्गावर खेर्डी येथे पोलिसांनी केलेल्या तपासणीत चोरीची संशयीत दुचाकी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयीत दुचाकीच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दिनांक २१ सप्टेंबर) पहाटे १.३० वाजताच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रुपेश उल्हास जोगी हे गस्त घालत होते. यावेळी चिपळूण ते कराड रस्त्यावर खेर्डी येथील कृष्णा प्लायवुडजवळ त्यांना काळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस गाडी (क्र. एम.एच.०९ एफ.ई. ८४७३) संशयास्पदरीत्या उभी दिसली. पोलिसांनी तात्काळ वाहनचालकाची चौकशी केली.
त्यावेळी वाहनचालकाने आपले नाव सुनील पांडुरंग पाटील (वय २८, सध्या रा. पिंपळी, चिपळूण; मूळ रा. तळगाव, राधानगरी, कोल्हापूर) असे सांगितले. पोलिसांनी त्याला गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे, ही गाडी चोरीची असल्याची पोलिसांची खात्री झाली.
पोलिसांनी तात्काळ ही दुचाकी जप्त केली. जप्त केलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ४०,००० रुपये आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रुपेश जोगी यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ नुसार सुनील पाटील याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, ही गाडी त्याने कोठून चोरली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
चिपळूण: चोरीच्या दुचाकीसह एकजण ताब्यात
