रत्नागिरी: देवरुख येथील एका सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला लुटल्याप्रकरणी सहभागी असलेल्या टोळीतील मुख्य संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सागर प्रकाश कदम (वय ३४, रा. कदमवाडी, हातखंबा, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव असून, तो या संपूर्ण गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मागील दोन महिन्यांपासून फरारी असलेल्या सागर कदम याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
आपली अटक टाळण्यासाठी कदम याने जिल्हा सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावत त्याला मोठा झटका दिला आहे. गेल्या सतरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास देवरुख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे ही खळबळजनक घटना घडली होती. सोने व्यापारी धनंजय केतकर हे त्यांच्या वाहनावर असताना, तोंडाला काळा बुरखा लावलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना जबरदस्तीने इरटीगा गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी केतकर यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोने आणि २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लुटला. लूट केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी केतकर यांना वाटूळ येथे एका पुलाखाली सोडून दिले. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात एकूण दहा जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत सागर कदम हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले.
दरम्यान, कदम याने न्यायालयात अर्ज करताना आपला गुन्ह्याशी संबंध नसल्याचा आणि आरोप खोटे असल्याचा युक्तिवाद केला होता, तसेच तो प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने तपासात अडथळा आणणार नाही असे म्हटले होते. परंतु, पोलिसांनी कदम हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठोस दावा न्यायालयात केल्यामुळे, न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप आणि संशयिताचा सहभाग लक्षात घेऊन त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे देवरुख पोलिसांवरील फरार मुख्य संशयिताला तात्काळ अटक करण्याचे दडपण वाढले आहे.





