रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.
कालपासून भोसले मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर सुरू असून, आज सकाळी त्यांनी रत्नागिरीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मुंबईहून मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना खड्डे, वाहतूक कोंडी असा कोणताही त्रास न होता सुरक्षितपणे प्रवास करता यावा या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. नऊ ते दहा ठिकाणी सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे एकंदर काम ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, रायगड जिल्ह्यातील माणगाव-इंदापूर भाग वगळता या महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळचे काम रखडल्याबद्दल कंत्राटदाराला दंड लागू करण्यात आला असून, आता काम वेळेत न झाल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. चिपळूणमधल्या उड्डाणपुलाचा काही भाग दीड वर्षापूर्वी कोसळला होता. त्याची संरचना बदलून तो नव्याने उभारण्याचे काम त्याच कंत्राटदाराकडून करून घेतले जात असून, त्यासाठी त्याला कोणतेही अतिरिक्त पैसे देण्यात आलेले नाहीत, असेही भोसले यांनी सांगितलं. पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेला हा देशातला एकमेव महामार्ग असल्याचे कबूल करतानाच, त्या वेळी गृहीत न धरलेल्या मात्र रस्ता सुरक्षिततेसाठी आता करणे आवश्यक असलेल्या कामांसाठी २०० कोटी रुपयांच्या स्वतंत्र निधीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केला जात आहे, अशी माहितीही भोसले यांनी दिली.
बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, आमदार किरण सामंत आदी उपस्थित होते. बैठकीत भोसले यांनी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले
