GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : निवळी येथे हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
31 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): जेवणानंतर आराम करत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष गोविंद चव्हाण (वय ५५, रा. निवळी, बावनदी परिसर, ता.जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) त्यांनी साठे यांच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेतले होते.

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यावर संतोष चव्हाण हे आपल्या घरी बेडवर आराम करत होते. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. डोळ्यासमोर अंधारी येऊन त्यांना चक्कर आली आणि ते बेडवरून खाली पडले.

हा प्रकार लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या लोटलीकर रुग्णालयात नेले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी संतोष चव्हाण यांची तपासणी केली असता, त्यांना उपचारापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3378949
Share This Article