रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्राचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. समर्थ रंगभूमी, रत्नागिरी या संस्थेने सादर केलेल्या ‘अग्निपंख’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे या नाटकाला एकूण सात पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, संगीत, वेशभूषा आणि प्रकाशयोजना अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये ‘अग्निपंख’ने यश संपादन केले.
वीरशैव समाज, लांजा या संस्थेच्या ‘ईठ्ठला’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला असून या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे आहेत. खरडेवाडी क्रीडा मंडळ, मेर्वी या संस्थेच्या ‘इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. दिग्दर्शन विभागात प्रथम पारितोषिक ओंकार पाटील (अग्निपंख), द्वितीय पारितोषिक अमोल रेडीज (ईठ्ठला) तर तृतीय पारितोषिक संदेश तोडणकर (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स) यांना मिळाले. प्रकाशयोजना विभागात प्रथम साई शिर्सेकर (अग्निपंख), द्वितीय दयानंद चव्हाण (ईठ्ठला) आणि तृतीय अभिजित डोंगरे (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स) यांना पारितोषिके देण्यात आली.
नेपथ्य विभागात प्रथम प्रवीण धुमक (अग्निपंख), द्वितीय संदीप सावंत (ईठ्ठला) तर तृतीय सत्यजित गुरव (येऊन येऊन येणार कोण?) यांना गौरवण्यात आले. रंगभूषा विभागात प्रथम उदयराज तांगडी (अग्निपंख), द्वितीय गजानन पांचाळ (ईठ्ठला) तर तृतीय नरेश पांचाळ (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स) यांना पारितोषिके मिळाली. संगीत दिग्दर्शन विभागात प्रथम ओंकार बंडबे (अग्निपंख), द्वितीय प्रदीप कांबळे (ईठ्ठला) आणि तृतीय योगेश मांडवकर (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स) यांना पुरस्कार जाहीर झाले. वेशभूषा विभागात प्रथम चैताली पाटील (अग्निपंख), द्वितीय संतोष डोर्लेकर (ईठ्ठला) तर तृतीय विश्वनाथ नवाले (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स) यांना पारितोषिके मिळाली.
उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक मिनार पाटील व ऋचा भुते (अग्निपंख) यांना देण्यात आले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अमोल रेडीज (ईठ्ठला), जयू पाखरे (ऑक्सिजन), संदेश तोडणकर (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स), गोपाळकृष्ण जोशी (येऊन येऊन येणार कोण?), अर्चना पेणकर-पांचाळ (ईठ्ठला), तन्वी शिंदे (इम्युनिटी – द व्हाईस ऑफ टॉलरन्स), डॉ. नेहा उकिडवे (मंगलाक्षता) आणि निवेदिता मणचेकर (ऑक्सिजन) यांना प्रदान करण्यात आली.
१० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अत्यंत उत्साहात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास पांगारकर, सुनील जगताप आणि संगीता टेकाडे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे रत्नागिरीतून कौतुक होत असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त नाटकांच्या संघांसह इतर पारितोषिक विजेत्या कलाकारांचे अभिनंदन केले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था व कलाकारांनी मेहनतीने सादर केलेल्या दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : ‘अग्निपंख’ प्रथम, सात पुरस्कारांची कमाई






