GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नाचणेतील शालेय विद्यार्थ्यांचे हाल: सकाळी बससाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ

Gramin Search
4 Views

रत्नागिरी – नाचणे गावातील गोडाऊन स्टॉपवर सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज बससाठी ताटकळत उभे राहावे लागत असून, त्यांची गैरसोय होत आहे. विशेषतः काजरघाटी मार्गे येणाऱ्या बसगाड्या पूर्ण भरलेल्या असल्याने अनेकदा त्या थांबत नाहीत आणि थांबल्या तरी विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून प्रवास करावा लागतो, अशी हृदयद्रावक स्थिती आहे. ही समस्या वर्षानुवर्षे भेडसावत असून, कॉलेज जीवनापासून ते आजतागायत ती तशीच असल्याचे येथील रहिवासी संतोष सावंत यांनी निदर्शनास आणले आहे.

या समस्येवर उपाय म्हणून संतोष सावंत यांनी आगार व्यवस्थापकांना एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. त्यांच्या मते, सकाळी धावणारी गुरूमळी बस (सध्या सकाळी 6.25 वाजता स्टँडवरून सुटते) सध्या या बसच्या वेळेत बदल करण्याची गरज आहे. सकाळी प्रवासी नसल्याने गुरूमळी बस 6.35 वाजता गुरूमळीत जाते आणि 6.40 वाजता परत निघते, त्यामुळे अनेकदा ती रिकामीच परत येते.

सावंत यांची आगार व्यवस्थापकांना विनंती आहे की, गुरूमळी बसची वेळ सकाळी 6.35 करावी आणि ती गोडाऊन स्टॉपवर सकाळी 7.00 वाजता येईल अशी व्यवस्था करावी. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळेल आणि ते सकाळी 7.30 पर्यंत शाळेत सुरक्षित पोहोचू शकतील. अन्यथा, गोडाऊन स्टॉपवरील विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन, याच वेळेत गोडाऊन स्टॉपसाठी एक स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अनेकदा या समस्येमुळे विद्यार्थी शाळेच्या वेळेत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे आगार व्यवस्थापकांनी तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी संतोष सावंत यांनी केली आहे.

या माहितीची प्रत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही पाठवण्यात आली आहे, जेणेकरून या समस्येचे निराकरण लवकरात लवकर व्हावे.

Total Visitor Counter

2652389
Share This Article