४१ गावांमधील १०६ विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाऊन प्रत्यक्ष भेट
संगमेश्वर : श्री विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाज मंडळ, तालुका संगमेश्वर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप करून सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील ४१ गावांमधील एकूण १०६ विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाऊन प्रत्यक्ष भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये दहावीचे ५५, बारावीचे ३९ आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील १२ विद्यार्थी सहभागी होते. हा उपक्रम २९ जून ते २८ जुलै २०२५ दरम्यान राबविण्यात आला.
या वर्षी स्व. चंद्रकांत तुकाराम मोगरोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित करण्यात आलेल्या ‘बारावी विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यासाठी रोख ११११ रुपये’ या पारितोषिकाची मानकरी निढळेवाडी येथील कु. पौर्णिमा दीपक नरबेकर ठरली.
तसेच दहावीची कु. वेदा वैभव आंबवकर हिने ९०% गुण मिळवत यश संपादन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत कु. स्वरा कृष्णा मेस्त्री हिने २४० गुण मिळवत जिल्ह्यात १८वा व तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिसऱ्या वर्षीही सलगपणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे समाजबांधवांकडून विशेष कौतुक होत असून, अशा उपक्रमांची पुढेही सातत्याने पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे पदाधिकारी यांचे मंडळाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
श्री विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाज मंडळातर्फे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
