GRAMIN SEARCH BANNER

देवळे गावी साकारतेय धनेशाची राई !

धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचा उपक्रम

संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील महाधनेश पक्ष्यांच्या अधिवासात आणि खाद्य वृक्षांच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून धनेश पक्ष्यांच्या अधिवास पुनर्निर्मितीचे कार्य गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी देवळे गाव येथे सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख, देवळे ग्राम समृद्धी अभियान, श्री देवी कालिश्री रवळनाथ मंदिर समिती, वन विभाग, आयडीबीआय बँक देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई मधील आढळ कमी होत चाललेल्या दुर्मिळ झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम श्री. देव रवळनाथ मंदिर, देवळे या मंदिराच्या परिसरातील देवराईत संपन्न झाला.

याप्रसंगी आयडीबीआयचे बँक मॅनेजर प्रतीक मनवानी ,त्यांचे सहकारी चंद्रप्रकाश सैनी व अक्षांश टेंभुर्णे हे उपस्थित होते .तसेच महाराष्ट्र प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी सहयोग कराडे व सुरज तेली साहेब हे देखील उपस्थित होते .सह्याद्री संकल्पचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

गाव स्तरावरून ग्राम समृद्धीचे प्रवर्तक निलेश कोळवणकर, दीपक गुरव ,यशवंत घागरे ,चंद्रकांत साळवी , दिलीप शिर्के ,भरत चव्हाण, विलास तथा बंडू शिंदे , गजानन मोघे व चिपळूणचे कृषी अधिकारी व देवळे गावचे ग्रामस्थ जयेश काळोखे हे उपस्थित होते .प्रामुख्याने महेंद्र चव्हाण व भरत चव्हाण या धनेश मित्रांच्या सहकार्यातून  हा प्रकल्प देवळे गावात साकारतो आहे.  याप्रसंगी सर्व उपस्थितांचे फूल देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले , कार्यक्रम प्रास्ताविक  प्रतीक मोरे यांनी करुन यामागील उद्देश स्पष्ट केला तर सूत्रसंचालन गजानन मोघे यांनी केले.

सह्याद्री संकल्प सोसायटी ही पर्यावरण संस्था, देवळे येथे त्यांचा हा उपक्रम गेली २०१८सालापासून सहा ते सात वर्ष राबवित आहेत. देवराई मधील जैव विविधता संरक्षण व संवर्धन या ध्येयाने ही संस्था सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. वेगाने नामशेष होणाऱ्या आणि जैव साखळी मध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वृक्षांची लागवड करणे आणि धोकाग्रस्त पक्षी, प्राणी यांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यावर्षी रत्नागिरी परिसरात दुर्मिळ होत चाललेल्या रान बिब्बा, चांदफळ, काळा धूप, गोयदडा, सुरंगी, बकुळ अशा तीन हजार वृक्षांची लागवड धनेश मित्र निसर्ग मंडळाने  केली आहे.

या वृक्षांची केवळ लागवड करून न थांबता त्यातून अशा वृक्षांची शाश्वत बीज बँक तयार व्हावी आणि जंगलाचे शेतकरी असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या माध्यमातून या वृक्षांचा प्रसार व्हावा अशी संकल्पना या प्रकल्पामागे आहे. या संस्थेचे संचालक श्री.प्रतीक मोरे सर,हे जागतिक हाॅर्नबील संवर्धन संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. सड्यावरील दुर्मिळ फुलांचे संरक्षण व संवर्धन, रानभाज्यांचे संवर्धन इ. असे अनेक उपक्रम ही संस्था जोपासत आहे. या अधिवास पुनर्निर्मिती कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी sahaydrisankalpsociety@gmail.com या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

2455455
Share This Article