रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी येणार्या चाकरमान्यांसाठी राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून याही वर्षी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गवासीयांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ गणपती स्पेशल विशेष गाडी जाहीर आली आहे.
दि. 23 व 24 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस ही गाडी दादर टर्मिनसवरून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी ही मोफत गाडी सोडली जाणार आहे. राणे परिवारामार्फत या उपक्रमाचे हे 13 वे वर्ष असून, यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन गाड्या सज्ज ठेवणार आहोत, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’ विशेष रेल्वे सेवा गेली 12 वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. यंदा ही सेवा विशेष असून, दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार असल्याची माहिती ना. राणे यांनी दिली आहे. दि. 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे गाड्या सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिन. 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे. शनिवारी 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी गाडी वैभववाडी व कणकवली येथे थांबणार आहे. या मोफत रेल्वे सेवेचा कोकणवासीयांना घ्यावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे
रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांसाठी 23, 24 ऑगस्टला ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार!
