लांजा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
लांजा : माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी डिपी प्लॅन जनतेसमोर ठेवला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र त्यांनीच जनतेचा घात केला असा घणाघाती आरोप लांजा तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
लांजा तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील पक्ष कार्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे लांजा तालुका अध्यक्ष राजेश राणे, प्रभारी जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी तालुका अध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, माजी शहराध्यक्ष तथा डिपी प्लॅन विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर तसेच महेश सप्रे आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की, मुळातच शहराचा प्रारूप विकास आराखडा अर्थात डीपी प्लॅन करताना लांजा नगरपंचायतीचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी लोकांना विश्वासात घेऊन या डीपी प्लॅन संदर्भात सर्वेक्षण करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता संगनमताने हा डीपी प्लॅन करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हा डीपी प्लॅन ऑफिसमध्ये बसून तयार करण्यात आल्याने त्यामध्ये अनेक त्रुटी, चुका आहेत. रिंगरोड हा रहिवासी भागातील लोकांच्या घरावरुन दाखवण्यात आला आहे. यामुळे अनेक घरं उध्वस्त होणार आहेत. अशा लोकांना मोबदला काय देणार? किंवा या लोकांना जागा कुठे देणार? आणि अशा प्रकारची राखीव जागा नगरपंचायतीने ठेवली आहे का? असा सवाल देखील यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपस्थित करण्यात आला.
या डीपी प्लॅनमुळे लांजा आणि कुवे येथील सुमारे २०० घरे ही तुटणार आहेत. अशा घरे तुटणाऱ्या लोकांनी तुटलेल्या घरांसाठी जागा कुठून आणायच्या? नवीन घरे बनण्यासाठी लोकांची आर्थिक परिस्थिती आहे का? या देखील बाबींचा विचार करणे अपेक्षित होते. मात्र तसा कोणताही विचार जनतेच्या संदर्भात तत्कालीन नगरपंचायतीच्या बॉडी किंवा अधिकारी यांनी केलेला नाही. लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. काँग्रेस पक्षाचा डीपी प्लॅनला विरोध नाही, विकासाला विरोध नाही. पण हा डीपी प्लॅन करताना लोकांचे कमीत कमी नुकसान कसे होईल? हे पाहणे गरजेचे होते.
डीपी प्लॅन करताना तो जनतेचा विचार करून करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता टंडन कंपनीने लोकांना विश्वासात घेतले नाही म्हणून लोकांचे नुकसान होणार असून त्या विरोधात हा असंतोष आहे. म्हणूनच आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेसोबत राहून जन आंदोलन उभे करू त्याचप्रमाणे वेळेप्रसंगी न्यायालयात देखील जाऊ असे यावेळी सांगण्यात आले.
माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी जनतेचा घात केला
