चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका वाढला असून, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन (आबू) ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, चिपळूण येथे धडक देण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पांडूशेठ माळी, सरपंच अजय महाडिक, प्रकाश पवार, आप्पा इंदुलकर, गणेश भुरण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन कुंभार्ली घाटातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत निवेदन सादर केले.
कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने अवजड वाहने, एसटी बस तसेच खासगी वाहने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्यावर निर्माण झालेले मोठमोठे खड्डे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून, विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना येत्या १५ दिवसांत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर दि. ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महामार्ग बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग विभाग कुंभार्ली घाटाच्या दुरवस्थेबाबत कोणती भूमिका घेतो आणि प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम कितपत वेगाने सुरू करतो, याकडे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुंभार्ली घाटाच्या दुरावस्थेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ७ सप्टेंबरला महामार्ग बंद आंदोलनाचा इशारा
Leave a Comment






