कोल्हापूर: शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी 1 जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यानुसार शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तर राज्य सरकारने दडपशाही करू नये. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये,असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
नागपूर – गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. त्याच बरोबर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी ऑनलाइन सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं, शेतकऱ्यांच्यात उद्रेक असून, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली
महाराष्ट्र सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी 20 हजार कोटींना मान्यता दिली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवल्याचं पाहायला मिळालं. याचं कारणं शेतकरी आंदोलनाचा धसका हे आहे. राजू शेट्टी यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार अखेर झुकले असल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून प्रशासनाकडून धाराशिवमध्ये मोजणी करण्यात येत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत चर्चा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेला जिल्हाधिकारी गैरहजर राहिल्यानं राजू शेट्टी नाराजी व्यक्त केली.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील

Leave a Comment