ग्राहकाला वेळेत फ्लॅटचा ताबा न दिल्याने 2 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश
रत्नागिरी/ समीर शिगवण: ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा ग्राहकाला न दिल्याने चिपळूण – सावर्डे येथील बांधकाम व्यावसायिक सुनील सावर्डेकर यांना रत्नागिरी जिल्हा ग्राहक न्यायालयाने चांगला दणका दिला. नुकसानभरपाई पोटी ग्राहकाला 2 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांनी हा निकाल दिला. तक्रारदाराच्या वतीने ॲड. योगेंद्र गुरव यांनी कामकाज पाहिजे. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सेवेतील त्रुटीबद्दल आणि ताबा देण्यास विलंब केल्याबद्दल नुकसान भरपाईचे आदेश दिले.
तक्रारदार सुनील चव्हाण (श्वेता रेसिडेन्सी बी 203 205 जि प शाळा क्रमांक एक च्या पाठीमागे टाकी रोड मु. पो. सावर्डे, चिपळूण) यांनी 29 जानेवारी 2024 रोजी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, मौजे सावर्डे येथील फ्लॅट 103, 203 205 आणि 206 या मिळकतीचे निवासी बांधकाम सर्व सोयीनियुक्त 3 वर्षाच्या आत करून देण्याचा करारनामा भूमी डेव्हलपर्सचे सुनील सावर्डेकर यांच्यामध्ये 2015 मध्ये झाला होता. ताबा विहित मुदतीत न दिल्यास तक्रारदार सुनील चव्हाण यांना दरमहा नुकसानभरपाई पोटी 10 हजार रुपये देण्याचे करारनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार 2018 साली फ्लॅटचे बांधकाम करून देणे आवश्यक होते. मात्र मुदत टळून गेली तरी ताबा न दिल्याने सुनील चव्हाण यांनी सुनील सावर्डेकर यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली. कायदेशीर नोटीस मिळताच डेव्हलपर्स सावर्डेकर यांनी 103, 206, 303 या फ्लॅटचे खरेदीखत करून दिले. मात्र 203 आणि 205 फ्लॅट चे खरेदीखत करून देणे बाकी होते. ते करून देण्यात 20 महिन्यांचा कालावधी लागल्याने करारनाम्यात ठरल्याप्रमाणे नुकसानभरपाई 10 हजार रुपयांप्रमाणे 20 महिन्यांचे 2 लाख सुनील चव्हाण यांना सावर्डेकर यांनी द्यावयाचे होते. परंतु ते त्यांनी दिले नसल्याने सुनील चव्हाण यांनी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. भूमी डेव्हलपरचे सुनील सावर्डेकर यांनी सुनील चव्हाण हे आपले ग्राहक नसल्याचे म्हटले होते. मात्र सुनील चव्हाण यांनी ग्राहक असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले.
तक्रारदार सुनील चव्हाण यांच्यातर्फे ॲड योगेंद्र गुरव यांनी सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले सादर केले. त्यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सुनील सावर्डेकर यांना 203, आणि 205 सदनिकांचा ताबा देण्यास विलंब, शारीरिक, मानसिक, त्रास, तक्रार अर्जाच्या खर्चा पोटी 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याची पूर्तता 45 दिवसाचे आत न झाल्यास आदेशाच्या तारखेपासून रक्कम पूर्णपणे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज तक्रारदार सुनील चव्हाण यांना देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सावर्डेतील बांधकाम व्यावसायिकाला रत्नागिरी ग्राहक न्यायालयाचा दणका
