रत्नागिरी: पूर्णगड येथे शेतीच्या कामासाठी जात असलेल्या एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. नरेंद्र शंकर आंबेकर (वय ४८, रा. तोसकरवाडी, गोळप) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र आंबेकर हे शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास गावातील आनंदा राजाराम बापट यांच्या शेतात गडगा घालण्याच्या कामासाठी पायी जात होते. कुंभारवाडी धारेजवळ बापट यांच्या खळ्यापाशी पोहोचले असता, आंबेकर यांच्या उजव्या पायाला कोब्रा जातीच्या सापाने दंश केला.
साप चावल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नरेंद्र आंबेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी : पूर्णगड येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, गणेशोत्सवात शोककळा
