राजापूर:राजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (वय ६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात आढळून आला आहे. याबाबतची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली.
सुरेश बेंद्रे हे ४ ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. ते घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. दरम्यान, त्यांच्या पायातील चप्पल दोनिवडे गावाजवळ नदीपात्रालगत आढळून आली होती. त्यानंतर त्यांच्या भावाने, जगन्नाथ बेंद्रे यांनी तत्काळ राजापूर पोलीस ठाण्यात सुरेश बेंद्रे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. चप्पल नदीकाठी आढळल्याने ते नदीपात्रात पडले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस आणि ग्रामस्थांकडून शोध सुरू होता. दरम्यान, राजापूर पोलीस प्रशासनाने चिपळूण येथून एनडीआरएफची टीम पाचारण केली होती. मात्र, टीम पोहोचण्यापूर्वीच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी तसेच बेंद्रे यांचे पुतणे दीपक बेंद्रे यांनी नदीपात्रात शोध घेतला असता बुधवारी सकाळी शीळ परिसरात सुरेश बेंद्रे यांचा मृतदेह आढळून आला.
यानंतर मृतदेहाचे पंचनामे करून शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
राजापूर : दोनिवडेतील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नदीत आढळला
