चिपळूण: चिपळूण शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. धुळे येथील एका नवविवाहित जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शहरातील गांधेश्वर मंदिराशेजारील पुलावरून घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी निलेश अहिरे (वय १९) आणि तिचा पती निलेश रामदास अहिरे (वय २६), हे दोघे सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी होते. त्यांचे मूळ गाव धुळे जिल्ह्यात आहे. आज दुपारी या दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गांधेश्वर पुलावरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारली.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संदर्भात पोलीस तपास सुरू असून आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच, येथे तैनात असलेल्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळ उशिरापर्यंत एनडीआरएफकडून या दांपत्याची शोधमोहीम सुरू होती, परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.
नीलेश आणि अश्विनी यांचा विवाह याच वर्षी मे महिन्यात झाला होता. नीलेश चिपळूण शहरात मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करत होता. ते दोघे काही महिन्यांपासून शहरातील पाग येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. नीलेश आणि अश्विनी यांनी कोणत्या कारणातून वाशिष्ठी नदीत उडी मारली, याचा उलगडा झालेला नाही. या घटनेबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मोबाईल व्यावसायिक आणि अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यामुळे वाशिष्ठी पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.