GRAMIN SEARCH BANNER

‘नाविन्यपूर्ण’मधून सृजनात्मक कामे असावीत; अखर्चित, प्रलंबित, अपूर्ण कामे प्रथम पूर्ण करावीत-पालक सचिव सीमा व्यास

Gramin Varta
10 Views

रत्नागिरी : ग्राम पंचायत स्तरावर अपूर्ण, प्रलंबित असणारी विकास कामे प्रथम पूर्ण करावीत. अशा कामात एखाद्याला  स्वारस्य नसल्यास, तसे शासनाला कळवून ती रद्द करावीत. नाविन्यपूर्ण योजनेमधील कामे ही सृजनात्मक असावीत, अशी सूचना पालक सचिव सीमा व्यास यांनी केली.

क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 150 दिवसांच्या आराखड्याबाबत श्रीमती व्यास यांनी नियोजन समिती सभागृहात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव श्रीमती व्यास यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अखर्चित अपूर्ण कामांबाबत त्या म्हणाल्या, 15 व्या वित्त आयोगामधून प्रलंबित, अपूर्ण असणाऱ्या कामांचा आढावा शासन स्तरावर घेण्यात आला आहे. निधी अखर्चित ठेवू नये. जिल्हा परिषदेने अशी अपूर्ण कामे कोणत्या कारणाने प्रलंबित आहेत, त्याचा आढावा घ्यावा. ती प्रथम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. एखाद्या गावाला त्यामध्ये स्वारस्य नसेल तर ते काम रद्द करण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा. 

नाविन्यपूर्ण योजनेमधून कामे राबविताना ती सृजनात्मक असावीत. जसा की जिल्हा परिषद शाळेतील मुलांना नासासाठी पाठविणे, हा तुमचा खरोखरच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. कमान बांधणे, बस शेड बांधणे यामध्ये काय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ?  या बाबी शासन स्तरावर ठळक झालेल्या आहेत. त्यामुळे नाविन्यपूर्ण योजना राबविताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक कामे करावीत.

निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले.

Total Visitor Counter

2651854
Share This Article