राजापूर/ राजन लाड: राजापूर तालुक्यातील तुळसुंदे (मावळतीवाडी) येथील श्री बालाजी भक्त मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त भव्य तिरुपती बालाजी भक्तीवारी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ ते मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत हा उत्सव साजरा होणार असून, यात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. गावातील श्री बालाजी भक्त मंडळ, श्री काडसिद्धेश्वर भक्त मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागातून हा भव्य सोहळा पार पडेल.
कार्यक्रमाची रूपरेषा:
उत्सवाचा शुभारंभ शनिवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तिरुपती बालाजी चषक क्रिकेट स्पर्धेने होईल. रात्री ९ वाजता तुळसुंदे येथील स्थानिक भजन मंडळांचे सुमधुर भजन कार्यक्रम होणार आहेत.
रविवार, १० ऑगस्ट रोजी क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू राहतील. तसेच, लायन्स क्लब रत्नागिरी यांच्यातर्फे सकाळी ११ वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १०.३० वाजता बालाजी महिला भक्त मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, ११ ऑगस्ट हा उत्सवाचा मुख्य आध्यात्मिक सोहळा असेल. सकाळी ५.३० वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर भजने, नामस्मरण आणि महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ५ वाजता प. पू. श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांचे आगमन होईल. त्यांची स्वागत यात्रा, दिंडी मिरवणूक, पाद्यपूजन आणि आध्यात्मिक सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम होईल.
उत्सवाचा समारोप मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती आणि तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्री १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आणि बक्षीस वितरण होईल. रात्री ११ वाजता पाटथर येथील हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ (बुवा सौ. प्राजक्ता परब-सावंत) आणि नाडण वरची येथील श्री माऊली प्रासादिक महिला भजन मंडळ (बुवा कु. किर्ती पुजारे) यांच्यात महिला डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.
हा चतुर्दिनात्मक उत्सव पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक पर्वणी ठरणार असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.