रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील एका ८६ वर्षीय वृद्ध महिलेचा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कमल शांताराम नाचणकर (रा. श्री समर्थ कृपा, एनपीसीआयएस शेजारी, मिरजोळे) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी राहत्या घरी ही दुर्घटना घडली असून याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कमल नाचणकर या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी अचानक चक्कर आल्याने त्या मागे कोसळल्या. जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आणि त्या बेशुद्ध पडल्या. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांचा मुलगा चंद्रकांत शांताराम नाचणकर यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जान्हवी यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या घटनेची माहिती मृताच्या मुलाने दिल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वयोमानानुसार आलेल्या चक्करमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास या घटनेची नोंद करून पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत.






