GRAMIN SEARCH BANNER

लोकसहभागातून कांटे शाळेचा कायापालट; दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून शैक्षणिक साहित्यासह आर्थिक मदतीचा ओघ

लांजा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लांजा तालुक्यातील कांटे येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ, विविध मंडळे आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत प्राप्त झाली आहे. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या दातृत्वामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडली असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या शैक्षणिक वर्षात निनाद नारायण बारस्कर यांनी विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट्स ड्रेससाठी आणि शालेय रंगकामासाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच मधुकर बारस्कर यांच्याकडून स्टील स्पिन मॉप आणि निशा नारायण बारस्कर यांच्याकडून गॅस शेगडी भेट देण्यात आली. शैक्षणिक साहित्यामध्ये भाजप फॉर यूथ आणि मुकेश चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वह्या व साहित्याचे वाटप करण्यात आले, तर गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनने एकल पालक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. शाळेच्या वीज बिलाचा वर्षभराचा खर्च पालकांनी उचलला असून, गावातील महाकाली नवतरुण मित्र मंडळ, धम्मदीप सेवा संघ आणि ग्रामस्थांनी शालेय रंगकामासाठी भरीव निधी जमा केला आहे. विशेष म्हणजे जांगलदेव नवतरुण मित्र मंडळ, मुंबई यांच्याकडून शाळेला आधुनिक वायरलेस प्रिंटर भेट देण्यात आला आहे.

या सर्व देणगीदारांचा सन्मान आणि साहित्य सुपूर्द करण्याचा कार्यक्रम नुकताच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा खारीचा वाटा उचलल्याची भावना यावेळी देणगीदारांनी व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रार्थना देसाई आणि शिक्षक पंकज खडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याचेही यावेळी ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. या मदतीमुळे शालेय वातावरणात सकारात्मक बदल होऊन कामकाजात गती येईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्याध्यापिकांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3484896
Share This Article