विधान परिषद निवडणूक : दहाव्या उमेदवाराच्या चर्चेने राजकारण तापले

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

मुंबई: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी यासाठी दबाव वाढत असताना, शिंदे गटाकडून दहावा उमेदवार उभा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी याबाबत संकेत देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांनी सांगितले की, “आमचे दोन उमेदवार निश्चितच संख्याबळाच्या जोरावर निवडून येतील. उरलेली मते आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. परिस्थिती पाहून दहावा उमेदवार देण्याचा निर्णय होऊ शकतो.” त्यांनी स्पष्ट केले की हा उमेदवार कोणाच्या विरोधात विशेषतः उभा राहणार नसून संख्याबळावर आधारित असेल.निरुपम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवारांशी तुलना केली. “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भावना असू शकते. मात्र उद्धव ठाकरे इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी,” असे ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह होत असला तरी ते स्वतः फारसे इच्छुक नसल्याचे समजते. जर त्यांनी उमेदवारी नाकारली, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे किंवा विनायक राऊत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे. सध्याच्या संख्याबळाच्या गणितात महायुतीचे पारडे जड मानले जात असून त्यांना 8 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाने दहावा उमेदवार उभा केल्यास मविआच्या एकमेव जागेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतील निवर्तमान आमदार :-

उद्धव ठाकरे (शिवसेना-ठाकरे), नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, रमेश कराड

निवडणूक कार्यक्रम:-

अधिसूचना: 23 एप्रिल 2026

अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2026

छाननी: 2 मे 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026

मतदान: 12 मे 2026 (सकाळी 9 ते सायंकाळी 4)

मतमोजणी: 12 मे 2026 सायंकाळी 5 वाजता

प्रक्रिया पूर्ण: 13 मे 2026

या पार्श्वभूमीवर, आगामी काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *