मुंबई-गुहागर प्रवासात चोरट्यांचा डल्ला; तब्बल पावणे चार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read
This is masked man robber with stolen gold.

गुहागर : मुंबईतील वरळी येथून गुहागरला येत असताना एका गृहिणीच्या बॅगेतून सुमारे ३ लाख ८४ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रवासादरम्यान घडलेल्या या धाडसी चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी मैथिली मिलिंद आरेकर (वय ५१, सध्या रा. वरळी, मुंबई) या आपला मुलगा ऋग्वेद याच्यासह २६ एप्रिल रोजी रात्री मुंबईतील आपल्या राहत्या घरातून गुहागरला येण्यासाठी निघाल्या होत्या. वरळी ते गुहागर या प्रवासादरम्यान २६ एप्रिलच्या रात्री २१:१५ ते २७ एप्रिलच्या सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. फिर्यादी यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे एक जांभळ्या रंगाचे पाकीट होते, ज्यामध्ये मौल्यवान सोन्याचे दागिने ठेवण्यात आले होते. चोरट्याने संधी साधून बॅगेतील हे पाकीट लंपास केले. यामध्ये १ लाख ३० हजार रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे ३८ इंच लांबीचे मोठे मंगळसूत्र, २ लाख ५२ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या आणि २ हजार ८०० रुपये किमतीचा सोन्याच्या जास्वंदीच्या फुलांची नक्षी असलेला कर्णफुलांचा जोड असा एकूण ३ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

प्रवास पूर्ण झाल्यावर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच आरेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या चोरीबाबत त्यांनी तातडीने गुहागर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) नुसार गुन्हा नोंदवला आहे. हा माल प्रवासादरम्यान नक्की कोठे चोरीला गेला, याचा शोध आता पोलीस घेत असून अज्ञात आरोपीचा माग काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. या घटनेमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *