दापोलीत भाड्याने घेतलेली कार हडपली; विश्वासाला तडा देत चालकाची फसवणूक, एकावर गुन्हा

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

दापोली : एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून व्यवसायासाठी भाड्याने घेतलेली चारचाकी गाडी मुदतीत परत न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील निगडे येथे घडला आहे. या प्रकरणी फिर्यादी अक्षय संजय रेवाळे (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. निगडे गोठणवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड तालुक्यातील मांडवे येथील आरोपीवर दापोली पोलीस ठाण्यात फौजदारीपात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश भागोजी सणस (रा. मांडवे, ता. खेड) याने फिर्यादी अक्षय रेवाळे यांचा विश्वास संपादन केला होता. त्याने रेवाळे यांच्या मालकीची ‘इर्टिका’ कार (क्रमांक MH 14 FX 2768) भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी घेतली होती. ठरल्याप्रमाणे ही गाडी २० एप्रिल २०२६ रोजी मालकाला परत करणे आवश्यक होते. मात्र, आरोपीने अप्रामाणिकपणे गाडीचा वापर सुरूच ठेवला आणि मुदत संपूनही ती रेवाळे यांना परत केली नाही. उलट, फिर्यादीच्या संमतीशिवाय ही गाडी स्वतःच्या उपयोगासाठी घेऊन तो पसार झाला असून अद्याप त्याने गाडीचा पत्ता लागून दिलेला नाही.

आपली गाडी आणि आरोपीचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे लक्षात येताच अक्षय रेवाळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घडलेल्या या प्रकाराबाबत २७ एप्रिल रोजी रात्री दापोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कायदा कलम ३१६(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. व्यावसायिक व्यवहारात अशा प्रकारे विश्वासघात झाल्याने वाहन चालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *