खेडमधील जनतेच्या समस्यांना मिळणार वाचा; ओएसडी संतोष साखरे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात ‘जनता दरबार’ संपन्न

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रश्न आणि अडीअडचणी थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी खेड येथील शासकीय विश्रामगृहात एका विशेष ‘जनता दरबारा’चे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाच्या समस्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रशासकीय कामातील अडथळे दूर व्हावेत, या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या दरबारात नागरिकांनी आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हेच मुख्य उद्दिष्ट असून, या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. यावेळी बोलताना, जनतेच्या विश्वासाच्या बळावर जनसेवेचा हा प्रवास अधिक जबाबदारीने पुढे नेणार असल्याचे आणि आगामी काळातही असे उपक्रम सातत्याने राबवून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहिबोले, खेड शहराध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद ऊर्फ दादू नांदगावकर, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम चौगुले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता यांच्यासह खेड तालुक्यातील नागरिकांनी आपल्या विविध समस्यांसह या जनता दरबारात मोठी गर्दी केली होती. स्थानिक प्रशासकीय पातळीवर सुसंवाद वाढवण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *