GRAMIN SEARCH BANNER

ग्रामीण भागातील नागरिक खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकतात,कुणबी महोत्सवात तालुका कृषी अधिकारी हेगडे यांचे शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीचे मार्गदर्शन

Gramin Varta
257 Views

सुहास खंडागळे व उदय गोताड यांच्या पुढाकाराने आयोजित ‘कुणबी महोत्सवचा पहिला दिवस उत्साहात संपन्न

देवरुख : “ग्रामीण भागातील नागरिकच खऱ्या अर्थाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. शेतकऱ्यांनी आता व्यावसायिक शेतीकडे वळणे काळाची गरज असून, यासाठी लागणारी सर्व मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग सदैव तत्पर राहील,” असा विश्वास तालुका कृषी अधिकारी श्री. हेगडे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुहास खंडागळे व उदय गोताड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘कुणबी महोत्सवात’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गावकर राजेश गोताड, बुधाजी खंडागळे, ढवळ गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, कृषी तज्ञ राहुल यादव, डॉ. मंगेश कांगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, केवळ उत्सव न साजर करता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ‘व्यावसायिक शेती’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. हेगडे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. गावातील शेतकरी सधन व्हावा आणि त्याला आधुनिक शेतीची जोड मिळावी, या उद्देशाने हे सत्र आयोजित करण्यात आले होते.

गावांच्या विकासाला दिशा देणारा महोत्सव: युयुत्सु आर्ते
यावेळी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी आयोजक सुहास खंडागळे व उदय गोताड यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सबळ झाला पाहिजे. ग्रामीण भागात कुणबी महोत्सव घेण्याची संकल्पना अत्यंत स्तुत्य असून हा महोत्सव गावांच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल.” कृषी तज्ञ राहुल यादव यांनीही शेतकऱ्यांना मोफत तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी दिली.

जो शेती करतो तो कुणबी: अमित रेवाळे
सामाजिक कार्यकर्ते अमित रेवाळे यांनी उपस्थितांना एकजुटीचा मंत्र दिला. “जो शेती करतो तो कुणबी,” अशी व्याख्या करत त्यांनी समाजाला विकासासाठी एक होण्याचे आवाहन केले. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात असा दर्जेदार महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वसंत मेस्त्री, जगन्नाथ दुदम, निखिल सकपाळ, तुषार गमरे,संदीप सावंत,रमेश मेस्त्री,प्रदीप चंदरकर,संगमरत्न फाउंडेशन, सूरज धावडे यांना मानाचा ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुझम्मील काझी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गोताड, अमित गमरे, सतेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आणि मोलाचे सहकार्य केले.

Total Visitor Counter

3388097
Share This Article