देवरुख: सोनवी घडगडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे श्वास सामाजिक संस्था, लालबाग -परळ, मुंबई संस्थेच्या संतोष पवार यांचे ‘नैतिकता व करियर एका नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, संस्था पदाधिकारी अनिल नांदळजकर, योगेश शिंदे, विक्रांत दर्डे, मुख्याध्यापक शिवाजी बडगर, यांच्यासह अविनाश म्हापार्ले, जगदीश उबारे, संदीप देसाई, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सरस्वती पूजनानंतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख वक्ते संतोष पवार यांना संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे यांनी शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. श्री. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. ध्येय निश्चित करून पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास उज्वल यश मिळते, याविषयी अनेक उदाहरणे दिली. यानंतर एकल पालकत्व, तसेच आई-वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना श्वास सामाजिक संस्थेकडून शैक्षणिक साहित्यासह, सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर श्वास सामाजिक संस्थेमार्फत संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, संचालक आणि मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले.
संस्थाध्यक्ष श्री.सनगरे यांनी आपल्या मनोगतात श्वास संस्थेचे आभार मानले . तसेच प्रमुख वक्ते संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन बहुमोल असल्याचे नमूद करून, त्यांच्या प्रति आभार मानले. तसेच संस्था व शाळेच्या उन्नतीसाठी श्वास संस्थेकडे सहकार्याची अपेक्षाही व्यक्त करून श्वास संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलेखा मोहिते यांनी केले व सर्वांचे आभार मानले.