रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत रत्नागिरी जिल्हावासियांनी लाडक्या बाप्पासह गौरीला मंगळवारी भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यातील २३ सार्वजनिक व १,०१,३२९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती पाठोपाठ आलेल्या दीड दिवसाच्या पाहुण्या गौराईला निरोप देताना महिला भावुक झाल्या होत्या. विसर्जन घाटावर दुपारपासूनच गर्दी झाली होती. गणरायाला निरोप देण्यासाठी मुसळधार पावसानेही हजेरी लावली. बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणेश मूर्तींचे वाजत गाजत उत्साहात आगमन झाले होते.
तितक्यात धुमधडाक्यात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू होता. दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र ऐन विसर्जनाच्यावेळी पाऊस सुरू झाला. पावसाळी वातावरण लक्षात घेत भाविकांनी विशेष दक्षता घेतली होती. डोक्यावरून ,हातगाडी, रिक्षा, कार, टेम्पो यातून प्लास्टिकचे आच्छादन टाकून मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. बॅन्जो ढोल ताशाचा गजर लेझीमचा तालावर गुलालाची उधळण करीत तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होत्या. सायंकाळी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मात्र विसर्जन घाटावर निरोपाची आरती करताना भाविकांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या होत्या. विसर्जनासाठी येणाऱ्या गाड्या मांडवी किनाऱ्यापर्यंत सोडण्यात येत होत्या मात्र अन्य गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मूर्ती विसर्जनास अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.