GRAMIN SEARCH BANNER

खेडशी देहव्यापार प्रकरण: सहा महिन्यांपासून फरार मुख्य संशयिताला अखेर अटकपूर्व जामीन

Gramin Varta
427 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर चालणाऱ्या देहव्यापार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ फरार असलेल्या मुख्य संशयिताला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सलमान नजमुद्दीन मुकादम (३०, रा. मिरकरवाडा) असे या संशयिताचे नाव असून, त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

​रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी १३ मे २०२५ रोजी ही कारवाई करून या अनैतिक देहव्यापाराचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अरमान खान याला अटक करण्यात आली, तर सलमान मुकादम व अन्य एका संशयितासह तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. अरमान व अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर, पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी फरार असलेल्या सलमानने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

​रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सलमानच्या वतीने त्याला नाहक गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आणि तपास पूर्ण झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने मात्र सलमान हा गुन्ह्यात थेट सहभागी असून, त्याच्याविरुद्ध पूर्वीचे अपहरणाचे प्रकरणही सुरू असल्याचे सांगत जामिनाला तीव्र विरोध केला.

​न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले की, तपास कागदपत्रांनुसार ताब्यात घेतलेल्या चारही महिलांनी जबाबात त्या ‘स्वेच्छेने’ या व्यवसायात सहभागी असल्याचे सांगितले आहे. तसेच जबरदस्तीचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. सहआरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला असून, गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्याने आता पोलीस कोठडीची गरज नाही. ही निरीक्षणे नोंदवत न्यायालयाने मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य संशयित सलमान मुकादमला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Total Visitor Counter

3199515
Share This Article