चिपळूणवासीयांनी जनता दरबारात खा. राणेंकडे मांडले विकासात्मक गाऱ्हाणे
जनता दरबाराच्या उत्तम नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक
चिपळूण: चिपळुणातील नागरिकांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील जी निवेदन दिली आहेत, ते कायद्याच्या चौकटीत असणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाय जे प्रश्न सुटू शकणार नाहीत, या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ‘एक्सप्लेशन’ घेतले जाईल. तसेच जिथे- जिथे विकास कामांसाठी निधी कमी पडेल. तिथे खासदार निधी देऊन जनतेचे विकासात्मक प्रश्न मार्गी लावू, शेवटी लोकांसाठी निधी असतो, त्याचा आपण पुरेपूर वापर करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूणवासीयांना आयोजित जनता दरबारात दिली. तसेच या जनता दरबाराच्या उत्तम नियोजनाबद्दल भाजप नेते प्रशांत यादव, सतीश मोरे, राजेश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे याचबरोबर अधिकारी वर्गाने उपस्थिती दर्शवून जनतेच्या प्रश्नांना सकारात्मकता दर्शविल्याबद्दल कौतुक केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात खा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी रेल्वेने आलेल्या खा. राणे यांचे भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, सतीश मोरे, राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, चिपळूण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक परिमल भोसले, रवींद्र नागरेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी जनता दरबारात चिपळूणवासीयांनी पोलीस, एस.टी. स्थानक इमारत बांधकाम, एस.टी. फेऱ्या, कोयना प्रकल्पग्रस्त, रस्ते, धरण दुरूस्ती, औद्योगिक वसाहत, साफंयीस्टमधील कामगारांचा प्रश्न, बीएसएनएल टॉवर, धनगरवाड्यांमधील रस्ते, परशुराम घाटाची दुरावस्था, चिपळूण शहरातील लाल, निळी पुररेषा, गोविंदगड किल्ला ते परशुराम रोपवे, गोविंदगड किल्ल्याची दुरावस्था, कोकण रेल्वे दुपदरीकरण, वंदे भारत एक्सप्रेसला थांबा, गाळ उपसा, चिपळूण न्यायालय इमारतीचे स्थलांतर, म्हाडाच्या जागेसंदर्भातील मोबदला अशा अनेक मुद्यांशी निगडीत प्रश्न चिपळूणवासीयांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर काही दिवसातच तोडगा काढण्याच्या सुचना खा. राणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी खा. नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात जनता दरबारात नागरिकांनी जे प्रश्न मांडले आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रात मंत्री असताना कमीत कमी १५ ते २० विभागांचा मंत्री होतो. आपल्या टेबलवर आलेली फाईल महिनोन्महिने राहिली असे कधीच घडले नाही. जतनेचा प्रश्न का सुटू शकत नाही? ते अधिकाऱ्यांकडून लेखी मागवत असे. तेव्हा लोकांचे प्रश्न तात्काळ सुटत असत, अशी आठवण मंत्रीपदाच्या कारकिर्दीची यावेळी खा. राणे यांनी उपस्थितांना करून दिली.
कार्यकर्ता तत्पर व परिपक्व असला पाहिजे. जनता दरबारादरम्यान आपले चौफेर लक्ष होते. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकवेळी आपल्याकडे प्रश्न येता कामा नयेत, असे स्पष्ट करताना कार्यकर्ता तत्पर व परिपक्व असला पाहिजे. जनतेचे समाधान होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्याने तो प्रश्न सोडविण्यासाठी झटत राहिले पाहिजे. जनतेनेदेखील थोडक्यात मोजक्याच योग्य शब्दात प्रश्न मांडले पाहिजेत, असे स्पष्ट केले.
*कार्यकर्ता जनतेला हवाहवासा वाटला पाहिजे*
जनता दरबारात वाचनालयाचा प्रश्न समोर आला नाही, याचा धागा पकडत खा. राणे यांनी आपण वाचन केले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांसाठी वेळ देणारा कार्यकर्ता हवा. यातूनच भाजपाचा कार्यकर्ता जनतेला हवाहवासा वाटेल, तेव्हाच या कार्यकर्त्याला निवडणूक जिंकणे सोपे होईल. आपण जनतेसाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे, यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव सुचविले. तेव्हा पदे मागण्यापेक्षा पदे मिळण्यात मोठा आनंद असतो, असा सुचक सल्ला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. जनतेचा सेवक मोठा असतो. नोकरी करणारा असो, लोकप्रतिनिधी असो, जनतेचे सेवक बनले पाहिजे. साहेब कधीही होऊ शकत नाही, या मताचे आपण आहोत, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जगाच्या पाठीवर विकसित देश म्हणून ओळख होत आहे. आर्थिक व्यवस्थेत भारत देश लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बेकारी, साक्षरता, गरीबी या विषयांवर लक्ष केंद्रित करून काम सुरू आहे. येथील तरूणांच्या हाताला इथेच काम मिळाले पाहिजे, अशी आपली भावना आहे. विशेष म्हणजे तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण दिले पाहिजे, मुंबई-पुणे यासारख्या शहरात न जाता इथे नोकरी करण्याबरोबरच उद्योजक, व्यावसायिक बनला पाहिजे, अशी आपली भुमिका आहे. यामुळे आपण दोडामार्ग येथे दोन हजार एकर जागा राखून ठेवली आहे. या जागेत ५०० ते १००० इंजिनिअरींग कारखाने आणायचे आहेत, असे स्पष्ट करून खा. राणे यांनी रोजगार निर्मितीची दिशा स्पष्ट केली.
*‘रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा’ विषयावर मंथन होणे गरजेचे!*
जनता दरबारात चार भिंतीमधील विचार आणि काही चांगले शब्द भिंतीवर आदळले असतील, ते कानातून हृदयात जाऊदे आणि यातून गुणात्मक विकास होऊदे, अशी भावना खा. राणे यांनी यावेळी व्यक्त केली. सिंधुदुर्गमध्ये ‘सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा’ असे आपण स्लोगन घेऊन पुढे जात आहोत. इथे सर्वच क्षेत्रातील लोकं येऊन आपले विचार मांडतात. तसेच ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा’ असे स्लोगन हाती घेऊन विचारमंथन होणे गरजेचे आहे. यातून नवीन पिढीला दिशा मिळेल, रोजगार निर्मिती होईल. उद्योग व्यवसाय वाढतील. कोकणाला भवितव्य चांगले आहे. आपला कोकण निसर्गरम्य आहे, हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा. राणे यांनी यावेळी शेवटी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, रामदास राणे, मंगेश तांबे, माजी नगरसेवक विजय चितळे, संदीप भिसे, शुभम पिसे, प्रफुल्ल पिसे, राकेश घोरपडे, शशिकांत साळवी, योगेश शिर्के, दिपक महाडिक, रूपेश आवले, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. रसिका देवळेकर, सौ. प्रणाली सावर्डेकर, जि.प. माजी सदस्या दिप्ती महाडिक, सौ. स्नेहा मेस्त्री, सौ. वैशाली निमकर, सौ. सुप्रिया उतेकर आदी उपस्थित होते.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील- खा. नारायण राणे






