संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यात सोमवारपाठोपाठ मंगळवारीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विघ्रवली खालीवाडी येथे आंब्याचे मोठे झाड घरावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. विघ्रवली येथील रमेश राजाराम कदम यांच्या घरावर अचानक आंब्याचे झाड कोसळले. यामुळे घराची पत्रे फुटली, तसेच घरातील साधनसामग्रीचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या वतीने तातडीने पंचनामा करण्यात आला. या वेळी सरपंच श्रद्धा गुरव, ग्रामसेवक सोनम कुंभार, तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनाम्यानुसार, कदम यांचे २ लाख ५७ हजार ७७० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
याचबरोबर, मांजरे बौद्धवाडी येथील धार्मिक बारका जाधव यांच्या घरासमोरील कुंपणाची भिंत कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.