रत्नागिरी: श्री मारुती-गणपती पिंपळपार देवस्थान आणि टिळक आळी गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे २७ ते २९ जून या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षातील ही पहिलीच स्पर्धा असून ती आठ गटात खेळवली जाणार आहे. स्पर्धा टिळक आळी येथील गणपती मंदिराशेजारील महिला मंडळ हॉलमध्ये होणार आहे. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट (पुरुष), कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट या प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे, अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच तालुका प्रतिनिधींकडे जमा करायच्या आहेत.
या स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. प्रवेशिकांसाठी प्रदीप परचुरे (गुहागर), विनायक जोशी (रत्नागिरी), राहुल भस्मे (देवरूख), मोहन हजारे, प्रकाश कानिटकर (चिपळूण), दीपक वाटेकर, मनमोहन बेंडके (संगमेश्वर), मनोज जाधव (लांजा), योगेश आपटे (खेड), मनोज सप्रे (राजापूर), माधव शेट्ये (दापोली) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत साई प्रकाश कानिटकर, मंदार दळवी व सागर कुलकर्णी हे प्रमुख पंच म्हणून तर मनोहर केळकर हे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.