दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार
लांजा : “कलगीतुरा उन्नती समाज मंडळ गेली ४५ वर्षे जाखडी लोककला संवर्धनाचे कार्य करत आहे; मात्र ही कला जिवंत ठेवणे हे कलाकारांसमोरील मोठे आव्हान बनले आहे,” असे प्रतिपादन शाहीर मोहन घडशी यांनी केले.
लांजा, राजापूर आणि रत्नागिरी कार्यक्षेत्र असलेल्या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (१० ऑगस्ट) अध्यक्ष चंद्रकांत पालकर यांच्या कुवे येथील निवासस्थानी पार पडली. यावेळी शाहीर मोहन घडशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “संस्थेची सभासदसंख्या वाढविण्यासाठी आणि जाखडी लोककला संवर्धनासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. शासनाने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना, योग्य मानधन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून ही कला टिकून राहील.”
सभेत अध्यक्ष चंद्रकांत पालकर यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला आणि आगामी वर्षासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी २०२४–२५ शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
मंडळाचे सचिव रविंद्र कोटकर यांचा राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार आणि सभासद राहुल आग्रे यांचा पत्रकारिता परीक्षेत विशेष यश मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच ४० वर्षांवरील कलाकारांसाठी जाखडी स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा करून सहभागाचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रविंद्र कोटकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन खजिनदार संदीप सांवत यांनी मानले. सभेला १२० सभासद उपस्थित होते. या यशस्वी सभेसाठी रासाई उत्कर्ष मंडळ, कुवे आणि कलगीतुरा उन्नती समाज मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
जाखडी लोककला संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे : शाहीर मोहन घडशी
