रत्नागिरी: गोळप गावातील महिला शेतकऱ्यांसाठी बीजांचे विविध वर्ग व बीज टॅगचे महत्त्व याविषयी रावेच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहिती दिली.
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि दापोलीतील कृषी महाविद्यालयातील बळिराजा ग्रुपच्या कृषीदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिकात बीज वर्गीकरण-न्युक्लिअस, ब्रीडर, फाउंडेशन आणि सर्टिफाईड बीज याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी वापरण्यात येणारे टॅग (टॅगचे रंग व त्यावरील माहिती) याचे महत्त्व महिला शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील प्रा. डॉ. यू. बी. पेठे तसेच डॉ. किरण मालशे आणि डॉ. संतोष वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले.
महिला शेतकऱ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण बियाण्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हे या प्रात्यक्षिकाचे मुख्य उद्दिष्ट होय. अनेक वेळा शेतकरी बाजारातून प्रमाणबाह्य किंवा चुकीचे बियाणे खरेदी करून आर्थिक नुकसान पत्करतात. त्यामुळे बीज वर्गीकरण, टॅग ओळख व प्रमाणित बियाण्यांची निवड याचे शास्त्रोक्त ज्ञान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
या उपक्रमातून कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधिक सक्रिय आणि सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला. महिलांचा शेतीत व बीज व्यवस्थापनात वाढता सहभाग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी बळकटीचा दुवा ठरत असून, अशा प्रशिक्षणांमुळे महिला शेतकरी आत्मनिर्भर व निर्णयक्षम बनतात. यामुळे कृषी क्षेत्रातील महिला सशक्तीकरण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन जयदीप जोशी, विश्वजित मालप, आदित्य खराटे, गौतम काळात, संकेत लेंगरे, ऋतिक मेंगे, उदयसिंह खिलारे, सोहम कदम आणि नितीश गोळे या बळिराजा ग्रुपच्या कृषीदूतांनी केले.
या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना बीजांची ओळख पटवून भविष्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी लाभ व्हावा हा उद्देश होता. गोळप येथील मार्गदर्शनाला अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.
रत्नागिरी : रावेच्या विद्यार्थ्यांकडून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Comment