नसरापूर हत्याकांड: अवघ्या ५५ दिवसांत खटल्याचा निकाल, न्यायालयीन इतिहासातील जलदगती सुनावणी

Gramin Varta
365 Views

आजच्या महत्वपूर्ण निकालाकडे राज्याचे लक्ष

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी घडलेल्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्याकांडाचा निकाल आज (गुरुवारी, २५ जून) न्यायालयात लागणार आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत (५५ दिवसांत) हा खटला निकालापर्यंत पोहोचणे, ही राज्यातील न्यायालयीन इतिहासातील अत्यंत दुर्मिळ आणि जलदगती सुनावणी ठरली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अत्यंत तत्परतेने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे केवळ १५ दिवसांत ११०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात ५५ पेक्षा जास्त साक्षीदार तपासले असून परिस्थितीजन्य पुराव्यांचे बळ या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून दररोज सुनावणी सुरू होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जलदगती न्यायामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *