GRAMIN SEARCH BANNER

उर्दू शाळांच्या वेळापत्रकावरून नवा वाद; शनिवारी शाळा १०:३० ते ५ वाजेपर्यंत भरवण्याच्या आदेशाने नाराजी

‘निदान विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करा’ – समाजसेविका रिझवाना इब्जी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील उर्दू शाळांसाठी जाहीर करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता शनिवारी शाळा सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भरवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला गेला नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या रिझवाना इब्जी यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उर्दू शाळा शुक्रवार आणि शनिवारी सकाळी ७:३० ते ११:३० आणि ७:३० ते १२:०० या वेळेत भरत होत्या. शुक्रवारी उर्वरित तासिका शनिवारी भरवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात होता.
नव्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा ताण वाढेल, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. तसेच, या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी शनिवारी शाळेत गैरहजर राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. “प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची मानसिकता समजते की नाही?” असा सवाल करत रिझवाना इब्जी यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

समाजाच्या अल्पसंख्यांक साधन गटाच्या माजी सदस्या असलेल्या सौ. इब्जी यांनी, महाराष्ट्रात कोणतेही कार्यालय शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू नसते, याकडे लक्ष वेधले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्रव्यवहार करून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, अनेक पालक आणि सामाजिक संघटनांनी या निर्णयाचा विरोध सुरू केला आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article