चिपळूण/ सचिन साडविलकर: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील ग्रामविकासाला नवी दिशा देणारे आणि आमदार शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्याचे मोठे यश आता दृष्टीस पडत आहे. ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने’तून मतदार संघातील ५ महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधणीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे, निरबाडे आणि वालोटी तसेच संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे आणि फणसवले या गावांच्या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधणीचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसंघटित होण्यास मदत मिळेल आणि जनतेसाठी सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार आहेत.गाव पातळीवर लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देणे आणि या गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा आमदार शेखर निकम यांचा प्रमुख ध्यास आहे. याच ध्यासातून त्यांनी निधी मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात अनेक विकास कामांना वेगाने गती मिळाली आहे, ज्यामुळे या भागातील ग्रामविकासाचे चित्रच बदलत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
जनतेच्या गरजांची योग्य जाण ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे विकास घडवून आणणारे आमदार शेखर निकम हे खऱ्या अर्थाने जनतेचे आधारस्तंभ ठरत आहेत, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मंजूर झालेल्या या १ कोटी रुपयांमुळे संबंधित ग्रामपंचायतींना अधिक आधुनिक आणि सुसज्ज इमारती मिळतील, ज्यामुळे प्रशासकीय सुविधा अधिक कार्यक्षम होणार आहेत.






