GRAMIN SEARCH BANNER

पुरुषप्रधान क्षेत्रात महावितरणमध्ये ठसा उमटवणारी करजुवेची रूपाली

सचिन यादव / संगमेश्वर

करजुवे हे डोंगररांगा आणि शेतीसाठी ओळखले जाणारे दुर्गम गाव. याच गावात दोन बहिणी आणि एक भावासह लहानाची मोठी झालेली रूपाली बाचिम—आज परिसरात “महावितरणची रूपाली” म्हणून ओळखली जाते. परंपरेने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या विजेच्या कामात तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रूपालीच्या बालपणातच वडिलांचे छत्र हरवले. आईने शेती सांभाळत चार मुलांना वाढवले. घरची परिस्थिती ताणलेली असताना पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. चुलते मंगेश कांगाणे आणि एका नातेवाइकांनी आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन कोर्सचा सल्ला दिला. हे ऐकून रूपालीने निर्णय घेतला—पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा.

संगमेश्वर येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्यावर तिच्या नजरेत आलं—इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला फक्त चार मुली! करजुवे ते संगमेश्वर हा रोजचा प्रवास, कोर्सचा प्रॅक्टिकल ताण आणि समाजाच्या नजरा… पण रूपाली ठाम राहिली. दोन वर्षांत 71 टक्के गुणांसह कोर्स पूर्ण केला.

यानंतर आरवली येथे वर्षभर कंत्राटी नोकरीत अनुभव घेतला. त्याच काळात महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदासाठीची जाहिरात पाहून तिने अर्ज केला आणि त्याच आरवली कार्यालयात तिची नियुक्ती झाली. 2021 पासून ती संगमेश्वर तालुक्यातील धामापुर विभागात कार्यरत आहे.

बिले वसूल करणे, मीटर बसवणे, फ्यूज बदलणे इतकेच नाही, तर पोलवर चढून फॉल्ट काढणे, तारा ओढणे, एकमेकांना चिकटलेल्या तारा वेगळ्या करणे अशी कामे ती सहज पार पाडते. अधिकारी अमोल म्हस्के आणि लाईनमन संदेश पारधी यांचे मार्गदर्शन तिच्या पाठीशी आहे, असे रूपाली सांगते.

आज रूपाली ग्रामस्थांसाठी फक्त विद्युत सहाय्यक नाही; ती रात्री अपरात्री, अडचणीच्या ठिकाणी धाव घेणारी विश्वासार्ह व्यक्ती आहे. पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवत तिने दाखवून दिले की जिद्द आणि मेहनत असेल, तर कोणताही प्रवास महिलांसाठी अशक्य नाही.

Total Visitor Counter

3484534
Share This Article