मुंबई: गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना आज मुंबईतल्या सर्वात लोकप्रिय गणेशमंडळांपैकी एक असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पाच्या आगमन सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली.
आज दुपारी परळ वर्कशॉपमधून कलागंधा आर्ट्सने साकारलेली २२ फुटांची भव्य मूर्ती चिंचपोकळीच्या मंडपात आणण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि भक्तीगीतांच्या तालावर वातावरण दुमदुमून गेले होते. भर पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.
गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बॅरिकेट्स उभारण्यात आले होते आणि वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले होते. तरीही मुंबईकरांनी आपला लाडका चिंतामणी बाप्पा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात सजला असून त्याचा शाही थाट भक्तांना आकर्षित करतो आहे. लाल रंगाचे धोतर, शेला आणि शाही सिंहासनावर विराजमान झालेल्या या रूपात बाप्पाचे आगमन पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.
मुंबईतील गिरणगावच्या मध्यभागी असलेले हे मंडळ यंदा १०६वे वर्ष साजरे करत आहे. 1920 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाची ख्याती ‘आगमनाधीश बाप्पा’ अशी आहे. परळ वर्कशॉप ते चिंचपोकळी हा काही मिनिटांचा प्रवास असला तरी भाविकांच्या उत्साही गर्दीमुळे ही मिरवणूक काही तास सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
गणेशोत्सवाच्या स्वागताला रंगत आणणारा चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला. यामुळे आता संपूर्ण मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणखी उधाण आले आहे.
भरपावसातही चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला भाविकांची प्रचंड गर्दी
