संगमेश्वर : गेली दोन दिवस वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मानसकोंड येथे घराची संरक्षक भिंत कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये घराला धोका निर्माण झाला असून घराची भिंत फुटली असून घराला धोका निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रवींद्र रोंगा फेपडे (48, फेपडेवाडी) यांनी वर्षभरापूर्वीच नवीन घर बांधले होते. यांच्या घराच्या बाजूला एक संरक्षक भिंत आहे. ही संरक्षक भिंत शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात कोसळली. ही भिंत घराच्या भिंतीवर धडकल्याने एका भिंतीचे चिरे कोसळून मोठे भागदाड पडले आहे. भिंत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने रवींद्र फेपडे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह घराच्या बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. भिंत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थानी धाव घेतली. घरातील साहित्य बाजूला करण्यात आले. सरपंच सुहास मायगडे, पोलिस पाटील सुनील शिगवण यांनी कुटुंबाला सुरक्षितस्थळी पोहोचविले. साध्या या घराला धोका निर्माण झाला आहे. या घटनेची खबर देवरुख तहसीलदार, आंबेड बुद्रुक तलाठी प्रतिभा साळुंखे यांना देण्यात आली आहे.
ब्रेकिंग : मानसकोंड येथे घराची संरक्षक भिंत कोसळली, लाखोंचे नुकसान, सुदैवाने कुटुंब बचावले
