रत्नागिरी: कोकणवासी समृद्ध आहेत. कोकणातील गावागावांचा इतिहासाशी संबंध आहे. त्याचा शोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले.
माजी जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये यांच्या बखर कर्ल्याची या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राजीव लिमये यांनी कर्ला गावातील लोकांचे मन जाणून घेतले, माणसाशी नाळ जुळल्याने ते लिहू शकले. कोतवड्याचे पटवर्धन, कर्ल्याचे खासगीवाले लिमये, नेवऱ्याचे खेर- गोविंदपंत बुंदेले, बसणीचे विसाजीपंत लेले, बसणीतील सर्कसवाले विष्णुपंत छत्रे अशी खुद्द रत्नागिरी तालुक्यातील अनेक नावे इतिहासाशी जोडलेली आहेत. या व्यक्ती बाहेर जाऊन मोठ्या झाल्या. ते परत आले नाहीत. पण हे सर्वजण राष्ट्रप्रेमी होते. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावाबद्दल लिहिले तर मोठा इतिहास तयार होईल.
आयुष्यात एक तरी पुस्तक लिहावे. लोक चांगल्या साहित्याच्या शोधात असतात. माणसे दुरावत चालली असताना खेडेगावातच माणसे एकमेकांना सांभाळून घेतात, गावात माणुसकी शिल्लक आहे. माणसाचे अस्सलपण शिल्लक आहे, असे दिसते. लिमये यांचे पुस्तक वाचताना निसर्गाच्या जवळ गेल्यासारखे भासते. त्यांनी यापुढेही पुस्तके लिहावीत, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात सत्त्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर म्हणाले की, सध्या वृत्तपत्रे, पुस्तके एका संक्रमणाच्या अवस्थेत आहेत. एआय तंत्रज्ञान आलेय. वृत्तपत्रे, पुस्तके राहतील का, अशी चर्चा होते. पण सकारात्मक विचारांचा प्रसार, अक्षय वाङ्मय प्रकाशित व्हायला हवे. कोकणात सापडलेली हजारो वर्षांपूर्वीची कातळशिल्पे हीसुद्धा लिपीपूर्वीचे संवाद माध्यम आहे. हा एक त्या काळातला दस्तऐवज म्हणावा लागेल. त्यामुळे लेखन प्रत्येकाने करावे. भविष्यात त्याचा दस्तऐवज म्हणून संशोधनासाठी उपयोग होईल.
यावेळी लेखक राजीव लिमये म्हणाले की, कोणालाही आपला गाव प्रिय असतोच. निवृत्तीनंतर समाजमाध्यमांत लिहायला सुरवात केली. साठाव्या वयात मन भावनाप्रधान व नॉस्टॅल्जिक झाले. जुन्या आठवणी आठवत गेल्या, तसे लिहीत गेलो. सुप्त लेखकांनी लिहायला सुरवात करावी. कॉर्पोरेट व औद्योगिक इतिहासाविषयी लेखन झाले पाहिजे. तसेच समाजातील विविध परंपरा, कोकणातले रंग लिहावे. ग्रामीण संस्कृती, गावपण जपण्यासाठी लिखाण करावे. कोकणातील भावबंध जपले पाहिजेत.
पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन अनिकेत कोनकर, सौ. मुग्धा लिमये व इयत्ता सहावीतील स्पृहा भावे हिने केले. वरुण लिमये आणि सौ. श्रेया लिमये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. तेजश्री भावे यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत, शिवसेना उपनेते बाळ माने, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये उपस्थित होते.
रत्नागिरी: कोकणातील गावागावांचा इतिहास शोधायला हवा – प्रकाश देशपांडे

Leave a Comment