रत्नागिरी : चिपळूण रेल्वे स्थानकावर मस्यगंधा एक्सप्रेसमधून मोनिका डिसुजा (वय ६३, रा. कन्यामरिया कंपाऊंड, मरणे पोस्ट, उडपी, कर्नाटक) यांची ३०,००० रुपये किमतीची हँडबॅग चोरीला गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका डिसुजा आपल्या पतीसोबत उडपी रेल्वे स्थानकातून मुंबईला जाण्यासाठी मस्यगंधा एक्सप्रेसच्या कोचमध्ये प्रवास करत होत्या. रात्री ११.०० च्या सुमारास त्यांनी आपली हँडबॅग सीटखाली ठेवून झोपल्या. १३ जुलै रोजी मध्यरात्री १.३५ च्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकावर गाडी थांबून सुरु झाल्यावर पाणी पिण्यासाठी जाग आल्यावर त्यांनी आपली हँडबॅग पाहिली असता ती जागेवर नव्हती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन हँडबॅग व त्यातील २०,००० रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी ए-५५ मोबाईल आणि १०,००० रुपये रोख रक्कम चोरली. चिपळूण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूण रेल्वे स्थानकावर महिलेची हँडबॅग चोरीला, 30 हजारांचा ऐवज लंपास
