राजन लाड/जैतापूर: नाटे-जैतापूर उतारावर आज सकाळपासून अडकलेला टँकर अखेर दोन क्रेन आणि एका जेसीबीच्या मदतीने यशस्वीरित्या हटवण्यात आला आहे. यामुळे गेल्या चार तासांपासून ठप्प झालेली अवजड वाहनांची वाहतूक आता पूर्ववत झाली असून, रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे.
या अपघातामुळे सकाळी वाहतूक विस्कळीत झाली होती. नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. तसेच, स्थानिक नागरिकांनीही वाहतूक जनजागृती करून पोलिसांना मोलाचे सहकार्य केले.
सागरी पोलीस ठाणे, नाटे येथील पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी या कामगिरीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. प्रवाशांनी पुढील प्रवास काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.