खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक शुक्रवारी सायंकाळी बोरिवली-चिपळूण बसफेरीमध्ये अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रस्त्याच्या मधोमध बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला.
एसटी महामंडळाच्या ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांमध्ये बिघाडांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एमएच-०८/एपी-६११९ या क्रमांकाची बस प्रवाशांना घेऊन चिपळूणकडे जात असताना, भरणे गावाजवळ ती अचानक बंद पडली. बसमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली.
बस रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना तिथेच ताटकळत उभे राहावे लागले. काही प्रवाशांनी खासगी वाहनांची मदत घेऊन पुढील प्रवास केला, तर काही प्रवासी एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसची वाट पाहत थांबले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे एसटीच्या देखभालीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.