GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात वातावरण तापले; भू ग्रामपंचायतीत लिपिकाला जातीवाचक शिवीगाळ, ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर धडकले

प्रशासकीय अधिकाऱ्यांसह, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल, दोघांवर गुन्हा

राजापूर/ तुषार पाचलकर: तालुक्यातील भू ग्रामपंचायतीतील लिपिकाला अधिकाऱ्यांसमोरच जातीवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना काल घडली. याप्रकाराने आज राजापुरात जनक्षोप उसळला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सारा जनसमुदाय ग्रामपंचायतीवर धडकला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शंकर सरफरे, अमित रमाकांत सरफरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सायंकाळी 4 वाजता पुन्हा सारे ग्रामस्थ राजापूर पोलिस ठाण्यात दाखल होणार आहेत.

सविस्तर वृत्त असे की, नरेंद्र कृष्णा जाधव (५५, रा. भू बौद्धवाडी राजापूर) हे येथील ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याबाबतची तक्रार राजापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता सरफरेवाडीतील रस्त्यावरील वादाच्या पाहणीसाठी गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, प्रशासक पी. व्हाय. सावंत, ग्रामसेवक प्रशांत कांबळी व संबंधित अधिकारी भू ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर सर्व जण रस्त्यावरील बांधाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या अनिल शंकर सरफरे यांनी नरेंद्र जाधव यांच्यावर “रेकॉर्डची वाट लावली” असा आरोप करत जातीवाचक शिवीगाळ केली.

नरेंद्र जाधव यांनी विरोध केल्यावर अमित रमाकांत सरफरे यांनीही जातीवाचक शब्दांचा वापर करत सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे नरेंद्र जाधव घाबरून गेले. त्यांनी राजापूर पोलिसात काल सायंकाळी 7 वाजता तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना भू परिसरात पसरल्यानंतर आज सकाळी 10 वाजता राजापूर तालुका बौद्ध जन संघ ग्रामीणचे अध्यक्ष महादेव गोठणकर आणि संघाचे सचिव उमाकांत जाधव यांच्या समवेत ग्रामस्थ आक्रमक होत ग्रामपंचायतीवर चाल केली. आक्रमक ग्रामस्थांनी प्रशासक सावंत यांना धारेवर धरत जाब विचारला. लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच रत्नागिरी मानवाधिकारी संघटनेचे गाडे, डी वाय एस पी माईनकर, पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सारेजण पोलिस ठाण्यात जमा होणार आहेत.

अखेर दोघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352, 351(2) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम 3(1)(R), 3(1)(S) प्रमाणे अमित सरफरे व अनिल सरफरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article