GRAMIN SEARCH BANNER

गँगवारमधून खून; मुख्य हल्लेखोरांना वाचवण्याचा डाव फसला; दोन सख्ख्या भावांसह तिघे अटकेत

Gramin Varta
200 Views

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून एका टोळीने सय्यद इम्रान सय्यद शफिक (३८) याची त्याच्याच मुलासमोर रेल्वेस्थानक उड्डाण पुलाखाली भररस्त्यावर अमानवी, क्रूर हत्या केली. बुधवारी रात्री ८:३० वाजता झालेल्या या गँगवार मध्ये सातारा पोलिसांनी रात्रीतून तपासाची चक्रे फिरवत नऊ तासांत मुख्य संशयित मुजीब डॉनचा सख्खा तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ सद्दाम हुसैन मोईनोद्दीन (३४, रा.
भीमनगर, भावसिंगपुरा) व आतेभाऊ शेख इरफान शेख सुलेमान (रा. बीड बायपास) याला झाल्टा फाटा परिसरात चालती कार थांबवून अटक केली.

सादातनगरात राहणारा इम्रान बुधवारी सायंकाळी त्याची दोन १३ वर्षांचा आयान व तीन वर्षांचा आजान या मुलांसोबत बाहेर गेला होता. रात्री ८:३० वाजता तो घरी जाताना उड्डाण पुलाखाली सिल्क मिल कॉलनी परिसरात अचानक सुसाट कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा जणांनी उतरून इम्रानच्या मुलांना रिक्षाबाहेर काढत इम्रानवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. इम्रानने शस्त्र पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याची बोटे कापून उजव्या हाताचे मनगट छाटले. त्यानंतर धारदार शस्त्राने डोके, मान छाटून क्रूर हत्या केली.

मृत इम्रानचे पडेगावच्या सय्यद मुजीब डॉनसोबत जुने वाद होते. त्यातून त्यांच्यात ३१ मे रोजी दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन, सय्यद सद्दाम सय्यद मोईनाेद्दीन यांच्यासह ८ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल होता. त्याचा बदला म्हणून बुधवारी मुजीब व इतरांनी इम्रानची हत्या केल्याचा आरोप इम्रानचा भाऊ सय्यद सलमान सय्यद शफिक यांनी केला. त्यावरून सय्यद सद्दाम सय्यद मोईनोद्दीन, सय्यद शादाब सय्यद मोईनोद्दीन, सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन, सय्यद मोसीन सय्यद मोईनोद्दीन, शाहरुख कुरेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर सोडण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या

हत्येनंतर सातारा पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवले. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, नंदकुमार भंडारे, निर्मला राख यांच्यासह अंमलदार दिगंबर राठोड, महेश गोले, दीपक शिंदे यांचे पथक पडेगाव, भावसिंगपुऱ्याच्या दिशेने रवाना झाले. यातील दोन हल्लेखोर सद्दाम हुसैन मोईनोद्दीन व शेख इरफान शेख सुलेमान वेगळ्या कारने बीड बायपासमार्गे शहराबाहेर जात असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली. पथकाने धाव घेत झाल्टा फाट्यावर पहाटे ५ वाजता त्यांना पकडले. त्यांच्या कारमध्ये हत्येत वापरलेला चाकू, तलवार सापडली.

प्रख्यात वकिलाकडून घेतली सुपारी

काही वर्षांपूर्वी नेवासा फाटा परिसरातून शहरात स्थायिक झालेल्या मुजीबचे मनपा मुख्यालय परिसरात वॉशिंग सेंटर आहे. मे महिन्यात गॅस व्यवसायावरून इम्रानसोबत त्याचे वाद झाले होेते. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून २०१७ मध्ये गुन्हे शाखेने त्याला पिस्तूल विक्री रॅकेटमध्ये अटक केली होती.

दहा वर्षांपूर्वी एका प्रख्यात वकिलाने स्वत:वरच गोळीबार झाल्याचा बनाव रचला होता. हा गोळीबार करण्यासाठी वकिलाने लष्करे हत्याकांडातील संशयित मुजफ्फर शेख (रा. नेवासा फाटा) याला सुपारी दिली होती. त्यात मुजीबदेखील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर तत्कालीन निरीक्षक अविनाश आघाव, गजानन कल्याणकर यांनी त्याला अटक केली होती.

Total Visitor Counter

2648137
Share This Article