GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: तहसीलदारांच्या ‘स्ट्रींग ऑपरेशन’नंतर पालशेतमधील वाळू उपसा करणाऱ्याला ३७,५०० रुपयांचा दंड

Gramin Varta
67 Views

गुहागर : तालुक्यात पालशेत समुद्रकिनारी अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपसा व्यवसायावर गुहागर तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे. ‘स्ट्रींग ऑपरेशन’ करून वाळू उपसा करताना पकडलेल्या विनय विनायक नागवेकर (रा. पालशेत) याला ३७,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असून, पुढील कठोर कारवाईसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार परिक्षित पाटील यांनी दिली.
गुहागरचे तहसीलदार पाटील यांनी पालशेत समुद्रकिनारी उघडपणे चालणाऱ्या अवैध वाळू उपशावर लक्ष केंद्रित करून अचानक ‘स्ट्रींग ऑपरेशन’ केले. या कारवाईत विनय नागवेकर या व्यक्तीला वाळू उपसा करून त्याची वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर ३७,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, ही दंडाची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात आली आहे.

दरम्यान, पालशेतनंतर आता गुहागर समुद्रकिनारी असणाऱ्या बाग ते वरचा पाठ या परिसरातील अवैध वाळू उपशावरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, कमी भरणा (रॉयल्टी) भरून मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अवैध उत्खनन आणि वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाने सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे तालुक्यात अवैध धंद्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

2648022
Share This Article