GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये खताचा गैरवापर करून शेतकऱ्यांची फसवणूक; 9 जणांवर गुन्हा, गुजरातमधील पुरवठादाराचा समावेश

रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक, अधिकाऱ्यावरही कारवाई

खेड : केंद्र शासनाकडून अनुदानित शेती उपयोगी निमकोटेड युरियाचा वापर औद्योगिक कारणांसाठी करून शासन आणि शेतकरी बांधवांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील मे. रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक आणि इतर अधिकारी, तसेच दोन पुरवठादार कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक सचिन बुवाजी फुले यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

१५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता खेड येथे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मे. रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक व व्यवस्थापकीय संचालक विजय चंद्रकांत मुलचंदानी, संचालक राजेश चंद्रकांत मुलचंदानी, करण दीपक मुलचंदानी, कुणाल राजेश जवानी, प्रॉडक्शन मॅनेजर तारा सिंग रावत, फॅक्टरी मॅनेजर दिनेश वसंतराव कदम, आणि स्टोअर इन्चार्ज राकेश रघुनाथ जडपाल यांच्यासह गुजरात येथील दोन पुरवठादार कंपन्या, के.व्ही.जे. केमिकल्स, अहमदाबाद आणि वाय.एम. अॅग्रो केमिकल्स अँड सॅनिटायझर, गांधीनगर यांच्याविरुद्ध आरोप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिव्हर साईड इंडस्ट्रीजला संभाव्य ‘टेक्निकल रोड युरिया’ पुरवणारे हे पुरवठादार आणि कंपनीच्या व्यवस्थापनाने संगनमत करून, केंद्र शासनाने शेतीसाठी अनुदानित केलेला निमकोटेड युरिया औद्योगिक कामांसाठी वापरला. यामुळे शासनाची आणि प्रामाणिक शेतकरी बांधवांची दिशाभूल होऊन त्यांची फसवणूक झाली आहे.

या गंभीर आर्थिक आणि कृषी विषयक गैरव्यवहाराबद्दल पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Total Visitor

0218139
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *