GRAMIN SEARCH BANNER

हवामानात तीव्र गारठा; संगमेश्वर तालुक्यावर थंडीची चादर

Gramin Varta
35 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : संगमेश्वर तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत असून कडाक्याच्या थंडीने अक्षरशः डोके वर काढले आहे. संध्याकाळ होताच गार वारे सुटू लागतात आणि रात्रीपासूनच थंडीचा प्रभाव अधिक तीव्र जाणवू लागतो. पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरत असून अंगावर काटा आणणारी थंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे.
या वाढलेल्या गारठ्यापासून बचावासाठी ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. चौकाचौकात, बसस्थानक परिसरात, चहाच्या टपऱ्यांजवळ तसेच रस्त्याच्या कडेला नागरिक शेकोटीभोवती घोळक्याने जमा होताना दिसत आहेत. विशेषतः पहाटे लवकर कामासाठी घराबाहेर पडणारे शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला या थंडीचा अधिक फटका बसत आहे.
पहाटेच्या वेळेस पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत असून वाहनचालकांना वाहन चालवताना विशेष दक्षता घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी धुक्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असून अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे.
थंडीचा परिणाम आरोग्यावरही होत असून सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांत वाढ होत असल्याचे स्थानिक आरोग्य केंद्रांकडून सांगण्यात येत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी गरम कपडे वापरणे, गरम पेयांचे सेवन करणे आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
शेतकऱ्यांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसत असून पहाटेची दवबिंदू आणि थंडीमुळे काही पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे.

पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असून पहाटे धुके आणि गार वारे सुरूच राहतील. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3369445
Share This Article