GRAMIN SEARCH BANNER

दाभोळ : भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, डोक्याला २५ टाके

दाभोळ: दाभोळ येथील वनकर मोहल्यात सध्या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा बळी एक चिमुकली ठरली असून, शनिवारी (२० जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात पाच वर्षांची आयात सुरकोजी ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला तब्बल २५ टाके पडले असून, सध्या तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, दाभोळ ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी नागरिकांनी केली आहे.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, आयात सुरकोजी ही लहान मुलगी नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गातून परत येत असताना वनकर मोहल्यात तिच्यावर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. कुत्र्यांच्या हल्ल्याने घाबरलेल्या आयातीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुत्र्यांनी तिला गाठून पायावर आणि डोक्याला चावा घेतला. आयातीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील घरातून नागरिक धावून आले. त्यांनी तात्काळ कुत्र्यांना पिटाळून आयातीची सुटका केली.

हल्ल्यात आयातच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिची जखम इतकी खोल होती की, डॉक्टरांना २५ टाके घालावे लागले. तिला सुरुवातीला दाभोळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु जखमेची गंभीरता लक्षात घेता, पुढील उपचारांसाठी तिला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वनकर मोहल्यात भटक्या कुत्र्यांचा हा पहिलाच हल्ला नाही. गेल्या चार दिवसांपूर्वी याच परिसरात कमर सुरकोजी यांच्यावरही कुत्र्यांनी हल्ला केला होता, परंतु प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले होते. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा आक्रमक स्वभाव यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दाभोळ ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वनकर मोहल्यातील रहिवाशांसह दाभोळमधील नागरिकांनी केली आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2475388
Share This Article